युवकांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायात प्रगती करावी - माजी कृषी उपसंचालक प्रतापराव पाटील

युवकांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायात प्रगती करावी -  माजी कृषी उपसंचालक प्रतापराव पाटील

इंदापूर || कोरोनामुळे अनेकांच्या हाताचे रोजगार गेले असून अनेक क्षेत्रात पदवी प्राप्त करुन बाहेर पडणाऱ्या युवकांची संख्या जास्त आहे. प्रत्येकाला शासकीय अथवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळेलचं असे नाही. युवकांनी हे लक्षात घेऊन रोजगाराच्या वाटा स्वतःहून निर्माण करायला हव्यात यासाठी युवकांनी नोकरीकडे कल न देता स्वतः उद्योगधंद्यात येण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी कृषी उपसंचालक प्रतापराव पाटील यांनी व्यक्त केले. ते मंगळवार दि.29 रोजी इंदापूर मध्ये जोगेश्वरी अँग्रोटेक या कृषी दालनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

कांदलगांव येथील प्रगतशील शेतकरी स्वर्गीय भास्करराव पाटील परिवाराने सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर मुख्य रस्त्यावर राधिका पेट्रोल पंपाच्या समोर महिंद्रा ट्रॅक्टर शोरुम शेजारी जोगेश्वरी अँग्रोटेक हे कृषी निविष्ठांचे दालन सुरु केले आहे. मंगळवारी दि.29 रोजी सकाळी पाटील परिवारातील जेष्ट श्रीमती.पुष्पावती भास्करराव पाटील यांच्या हस्ते फित कापून याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पाटील परिवारातील सर्व सदस्य,मित्र परिवार उपस्थित होता.

पाटील म्हणाले ,की सध्या कृषी क्षेत्रात अनेक तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. अनेक तरुण या क्षेत्रात तंत्रज्ञान अवगत करुन बाहेर पडत आहेत.विकसित केलेले तंत्रज्ञान खर्या अर्थाने शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवण्याचे काम या कृषी दूतांनी केले पाहिजे. जोगेश्वरी अँग्रोटेक हे दालन पाटील परिवारातील शिक्षित असणारा तरुन गणराज हे चालवणार आहेत. निश्चित ते शेतकरी वर्गाला या क्षेत्रात समाधानकारक समोपदेशन करतील. कृषी पदवीधारकाचे दुकान असल्याने शेतकऱ्यांना योग्य दरात लेबल क्लेम प्रमाणे प्रत्येक पिकासाठी औषधे पुरवठा करावीत.शिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सल्ला द्यावा.चांगल्या प्रतीची सेवा देऊन अवगत तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवतील अशी मला अपेक्षा आहे.

शेतकरी बांधवांनी देखील नवीन तंत्रज्ञान समजून घेऊन त्याप्रमाणे शेती केली तर निश्चित अपेक्षित प्रगती आपणांस साधता येईल.त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन नवतंत्रज्ञानाची कास धरण्याची गरज आहे. कृषी निविष्ठा चालकांनी देखील वेळोवेळी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती अवगत करुन परिसरातील शेतकरी वर्गापर्यंत पोहचवणे काळाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. पाटील यांच्या या कृषी दालनास मी मनपूर्वक शुभेच्छा देतो.