कृषी विभागाने भरवली बेडशिंगे परिसरात महिलांसाठी कार्यशाळा ; बीबीएफ तंत्रज्ञानावर दिला भर

कृषी विभागाने भरवली बेडशिंगे परिसरात महिलांसाठी कार्यशाळा ; बीबीएफ तंत्रज्ञानावर दिला भर

इंदापूर || महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने इंदापूर तालुक्यात दि.21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीमध्ये कृषी संजीवनी मोहीम हे विशेष अभियान राबवण्यात येत आहेत. या निमित्ताने कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

बीज प्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर , ऊस लागवड तंत्रज्ञान ,रुंद वरंबा सरी पद्धत अशा महत्वपूर्ण विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून गुरूवारी दि.24 रोजी मौजे बेडशिंगे येथील यादव वस्ती या ठिकाणी महिलांसाठी खास करुन शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मंडळ कृषी कार्यालयाचे ए.एच. कलाल, ए.के. कदम, अतुल जावळे , संदीप घुले व प्रगतीशील शेतकरी बबन काळे, गणेश यादव,अरूण काळे उपस्थित होते.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवड तंत्रज्ञान व सुपर केन नर्सरी विषयक मार्गदर्शन केले. तसेच यावेळी रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तर कृषी सहाय्यक अनुपमा देवकर यांनी बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजेच रुंद वरंबा सरी पद्धत होय याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

बीबीएफ तंत्रज्ञान पध्दत अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये वरदान ठरत आहे. ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो अशा ठिकाणी या तंत्रज्ञानामुळे पाण्याचे जलसंवर्धन होते.तसेच पाऊस जास्त झाल्यास पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाल्यामुळे पिकांचे नुकसान टळते या यंत्राने पेरणी केल्यास खत व बियाणे यांमध्ये बचत होऊन उत्पादनामध्ये 20 ते 25 टक्के वाढ होते. आंतरपीक पेरणी करण्यासाठीही बीबीएफ तंत्रज्ञान वापरले जाते असे ही देवकर यांनी सांगितले.

यावेळी कृषि पर्यवेक्षक श्री.कल्याण पांढरे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड गांडूळ खत युनिट ,नाडेप युनिट विषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमास उपस्थित महिलांनी वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी केली आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.