धक्कादायक ! मळणी यंत्रात अडकल्यामुळे महिलेचा मृत्यू 

धक्कादायक ! मळणी यंत्रात अडकल्यामुळे महिलेचा मृत्यू 

सोलापूर 27 // जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील पोथरे येथे मळणी यंत्रात अडकल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उषा पंडीत झिंजाडे (वय 42 वर्षे), असे मृत महिलेचे नाव आहे. दि.26 फेब्रुवारी रोजी दुपारी बाराच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. 

पोथरे येथील शेतकरी पंडीत झिंजाडे हे मळणी यंत्रावर ज्वारी करत होते. यावेली त्यांचा मुलगा अनिकेत व पत्नी उषा या देखील त्यांना याकामी मदत करत होत्या. ज्वारी मळणीचे काम संपत आले असताना उषा झिंजाडे या मळणी यंत्राखाली पडलेले भुसकट वाकून काढत होत्या. त्यावेळी ट्रॅक्टर व मळणी यंत्र ज्या ठिकाणी जोडले जाते त्या ठिकाणी उषा झिंजाडे यांच्या डोक्याचे केस अडकले आणि हा अपघात झाला. केस अडकल्याने मळणी त्या भागात  त्यांचे डोके फिरुन डोके शरीरापासून वेगळे झाले आणि क्षणार्धात उषा झिंजाडे यांचा अंत झाला.