आरोग्यनामा || न्यूमोनिया म्हणजे काय ? लक्षणे व उपचार - डाॅ.पंकज गोरे 

आरोग्यनामा || न्यूमोनिया म्हणजे काय ? लक्षणे व उपचार - डाॅ.पंकज गोरे 

इंदापूर 23 // आजच्या "या आरोग्यनामा" सदरात आपण न्यूमोनिया म्हणजे काय ? त्याची लक्षणे व उपचार याबद्दल माहिती घेणार आहोत. इंदापूर येथील प्रसिध्द बालरोग तज्ञ डाॅ.पंकज गोरे यांचे शिक्षण एम.डी.आयुर्वेद झाले असून ते गेली अनेक वर्षे आपल्या स्वतःच्या खाजगी रूग्णालयात (गोरे हाॅस्पिटल) मध्ये सेवा बजावत आहेत. या जिवाणू जन्य आजाराविषयी त्यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे.

न्यूमोनिया हा श्वसन संस्थेचा आजार आहे. न्यूमोनिया हा जंतूमुळे पसरणारा आजार असून न्यूमोनिया फुफ्फुसाच्या काही भागातच होतो. यामध्ये फुफ्फुसांच्या आतील अल्वोवोलाय - म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये वायूच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये द्रव साठू लागतो. या जंतूमुळे श्वासनलिकेला व फुफ्फुसाला सूज येते त्यामुळे वेदनाही होऊ लागतात. न्यूमोनिया हा अचानक येणारा कमी कालावधीचा तीव्र स्वरुपाचा आजार आहे व उपचार न केल्यास प्रसंगी व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

न्यूमोनिया हा आजार कोणासही होऊ शकतो. परंतु पाच वर्षाखालील मुलांमध्ये न्युमोनियाचे प्रमाण जास्त आढळून येते. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसामध्ये जिवाणू, विषाणू किंवा कवकांचा संसर्ग होतो. फुफ्फुसाच्या वायुकलिकामध्ये द्रव किंवा पू साठतो. यामुळे वायुकलिकामधून पुरेसा ऑक्सिजन शरीरास मिळत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पेशींचे कार्य नीटसे होत नाही. योग्य उपचार केले नाहीत तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व्यक्तीचा मृत्यू ओढवतो.

भारतामध्ये बरीच मुले या आजाराने दगावण्याचे प्रमाण आहे. न्युमोनिया हा बालकांचा अदृश्य मारेकरी आहे. मलेरिया, गोवर किंवा एड्सने मरणाऱ्या मुलांपेक्षा न्युमोनियामुळे मरणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये न्युमोकोकस या जीवाणूने औषधांना विरोध करायला सुरुवात केली आहे आणि हीच सर्वांत गंभीर बाब आहे.

लक्षणे :- पाच वर्षाखालील मुलामुलीमध्ये छाती उडते व त्याचबरोबर ताप असल्यास न्यूमोनियाची शक्यता जास्त असते. बोटाने छातीवर वाजवून बघितल्यास फुफ्फुसाच्या सुजलेल्या भागावर ठप्प असा आवाज येतो. लहान मुलांना श्वास घेताना त्रास होतो. आईचे दूध नीट ओढता येत नाही.ताप,थंडी वाजणे,खोकला,श्वास जलद होणे (गति वाढणे ),श्वास घेताना धाप लागणे,छातीत आणि पोटात दुखणे,शक्तिपात,उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येतात.

उपचार :- न्यूमोनिया हा गंभीर आजार असल्यामुळे योग्य त्या डॉक्टरांकडून उपचार होणे आवश्यक असते. वरीलपैकी काहीही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरु होऊन तीव्रता (गंभीरता) कमी होऊ शकते.

प्रतिबंध :- सध्या निमोनिया हा आजार  बर्याच प्रमाणात टाळता येऊ शकतो त्यासाठी निमोनिया विरोधक लसीकरण उपलब्ध आहे.

याबाबत अधिक च्या माहितीसाठी आपण डाॅ.पंकज गोरे यांच्याशी भेटून सल्ला घेऊ शकता.
संपर्क - 02111 - 224433 / 9420213082