जनता कर्फ्यू गरजेचा होता का? 

जनता कर्फ्यू गरजेचा होता का? 

12 ते 20 सप्टेंबर या दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी इंदापूर तालुक्यात प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित रित्या जनता कर्फ्यू जाहीर केला होता. सर्वसामान्य नागरिकांनी जनता कर्फ्यूचे तंतोतंत पालन केले. आठ दिवस कडेकोट बंदोबस्तात इंदापूर शहर व तालुका होता. कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने घोषीत करण्यात आलेला जनता कर्फ्यू उपयोग झाला कि नाही हे तालुक्यातील रुग्ण संख्येवरुन लक्षात येते. 

लाॅकडाऊन च्या पहील्या दिवशी 40 रुग्ण आढळले. त्यानंतर कोरोनाची साखळी तुटेल असे वाटत असताना दुस-या दिवशी रुग्णांचा आकडा 49 वर गेला. चौदा सप्टेंबर ला तर कहर झाला रुग्ण संख्या 139 वर जाऊन ठेपली. जनता कर्फ्यूच्या तिसऱ्या दिवशीच रुग्ण संख्या वाढल्याने चिंता वाढू लागली.मात्र चौथ्या दिवशी तो आकडा कमी होऊन 69 वर आला.लागोपाठ पाचव्या दिवशी तो आकडा 77 जाऊन ठेपला यावरुन रुग्णसंख्यांचा आकडा खालीवर होताना दिसत असला तरी कोरोनाची साखळी तुटली नाही हे सिध्द होते. त्यानंतर 17 सप्टेंबरला कोरोनाचे 55 रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडीत होतीय का?  असे वाटू लागले. परंतु अठरा सप्टेंबर ही रुग्ण संख्या 79 वर जाऊन ठेपली. लागोपाठ दुस-या दिवशी एकोणिस सप्टेंबर ला रुग्ण संख्या 83 वर गेली. या सलग सात दिवसाच्या कालावधीत रुग्णसंख्यांचे प्रमाण कमीजास्त झाले असले तरी रुग्ण वाढताना दिसत होते. या दरम्यानच्या कालावधीत इंदापूर तालुक्यातील गावामध्ये सर्वेक्षण सुरु होते त्यामुळे रुग्ण वाढले हाच निष्कर्ष काढता येऊ शकतो.वीस सप्टेंबर ला मात्र रुग्णांचा आकडा कमी होऊन 23 वर पोहोचला. आठव्या दिवशी मात्र कोरोनाची साखळी तुटताना दिसली.प्रशासनाने घेतलेला जनता कर्फ्यूचा निर्णय योग्य असल्याचे पक्के झाले. मात्र 21 सप्टेंबर ला ही बाब पक्की न राहता पुन्हा रुग्ण संख्या वाढून ती 51 वर पोहोचली.  बावीस सप्टेंबरला 80 तर तेवीस सप्टेंबर ला 40 आणि चोविस सप्टेंबर ला पुन्हा 49 अशी क्रमवारी पहायला मिळाली. 

वरिल रुग्णसंख्येच्या आकडेवारी वरुन जनता कर्फ्यूच्या काळात कोरोनाची साखळी तुटणे अपेक्षित होते ते झालेले दिसून येत नाही. यावरुन जनता कर्फ्यू चा फायदा झालेला दिसत नाही. केवळ घरात बसलेले कोरोना बाधीत यांची तपासणी झाली एवढेच निष्पन्न होते. लाॅकडाऊन नंतर अनलाॅक -1 मध्ये तालुक्यातील अनेक जनांनी बाहेरगावी फेरफटका मारला. त्यामुळे ती मंडळी बाधीत झाली असे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊन 23 पासून 139 रुग्णांपर्यंत रुग्ण आढळले. आज अखेरीस उपलब्ध माहिती अशी कि एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 2291 त्यापैकी शहारी 423 तर ग्रामिण भागातील 1868 रुग्णांचा समावेश आहे. या एकूण रुग्णांपैकी औषोधोपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1461 आहे.यातील 318 शहरातील तर 1143 ग्रामीण भागातील रुग्ण आहेत. 1143 या रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आलेले आहे. आज पर्यंत इंदापूर निमगांव केतकी आणि भिगवण या ठिकाणी 735 रुग्ण औषधोपचार घेत आहेत. उपचार घेणा-या रुग्णांपैकी 75 शहरातील तर 660 ग्रामिण भागातील रुग्ण आहेत. आज अखेर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या एकूण 88 असून त्यापैकी इंदापूर शहरातील 21 तर ग्रामीण भागातील 67 व्यक्तींचा समावेश आहे. 

इंदापूर तालुक्यात ज्या प्रमाणात कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने पावले टाकणे गरजेचे होते ते झालेले नाही.तसेच निमगांव केतकी आणि भिगवण येथील सुविधा मिळण्यास ब-याच कालावधीची प्रतिक्षा करावी लागली. केंद्र सरकारणे लाॅकडाऊन जाहिर करण्यामागे आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी व उपचार पध्दतीचे संशोधन करण्यासाठी कालावधी घेतला होता. मुंबई-पुणे वगळता इंदापूर सारख्या ठिकाणी जंम्बो कोवीड सेंटर होणे गरजेचे आहे. कोणत्याही शैक्षणिक संकुलाला अधिग्रहण करुन एक नवे कोवीड सेंटर सुरु करणे गरजेचे असताना याकडे प्रशासनाने कानाडोळा करत जनता कर्फ्यू जाहीर केला. रुग्ण संख्या वाढत असताना त्या रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी ठोस पावले उचलने गरजेचे होते. आज तीस टक्के रुग्ण पुण्यासारख्या ठिकाणी दररोज दाखल होताना दिसून येत आहेत. या रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी राजकीय मंडळींची कसोटी लागत आहे. जर वेंटीलेटर,आँक्सिजन, औषधे युक्त सेंटर चालू झाले असते तर ग्रामीण भागातील रुग्णांना अकलूज, बारामती, पुणे अशा ठिकाणी धावाधाव करावी लागली नसती. जनता कर्फ्यू जाहीर करण्यात धन्यता मानून प्रशासनाने वेळ काढू पणा केलेला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही.प्रशासनाने तातडीने पावले उचलून इंदापूर सारख्या ठिकाणी अद्यावत शंभर-दोनशे बेडचे आँक्सिजन,व्हेंटेलटर सह कोवीड सेंटर सुरु करावे. तसेच इंदापूर शहरातील खाजगी डाॅक्टरांना बरोबर घ्यावे. त्यासाठी त्या डाॅक्टरांना योग्य तो मोबदला द्यावा. नवशिक्षित ए.एन.एम.,जी.ए.एन.एम. परिचारिका नियुक्त कराव्यात. कोरोनाचे संकट अटोक्यात आणन्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. रेमडिसीवर इंजेक्शन शासकिय रुग्णालयात उपलब्ध करावे.