धारावीला वाचवण्यासाठी 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करा - खासदार राहुल शेवाळेंची मागणी

धारावीला वाचवण्यासाठी 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करा - खासदार राहुल शेवाळेंची मागणी

मुंबई || राज्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. मागील लाटेत मुंबईतील धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट होता. मात्र या वर्षी पुन्हा ती स्थिती उद्भवू नये, यासाठी धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस टोचली जावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी तशा मागणीचे लेखी पत्र ही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पाठवले आहे.

मागील वर्षी धारावी हा कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट झाला होता.  सरकार आणि महानगरपालिकेने केलेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे धारावीकरांनी त्यावर मात मिळवली. राज्यात आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत पुन्हा धारावीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस टोचल्यास मोठ्या संकटापासून धारावी आणि मुंबई वाचू शकेल असे शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

याचशिवाय कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उद्भवलेली बेड्सची कमतरता भरून काढण्यासाठी राज्य सरकारने रेल्वेच्या कोचेसचा वापर करावा, तसेच मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) च्या गोडाऊनमध्ये कोविड सेंटर उभारण्यात यावं अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.