…साहेब तुम्ही काळजी करु नका ; आम्ही जबाबदारी पूर्ण करतो - जयंत पाटील

…साहेब तुम्ही काळजी करु नका ; आम्ही जबाबदारी पूर्ण करतो - जयंत पाटील

पंढरपूर || पवारसाहेब तुम्ही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची काळजी करु नका. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, आम्ही ही जबाबदारी पूर्ण करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांची उमेदवारी सोमवारी जाहीर केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जयंत पाटील पंढरपुरात आले होते.त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी (31 मार्च) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पवार पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार का? त्याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता,ते म्हणाले, 'शरद पवार यांच्यावर उपचार सुरु आहेत. वैद्यकीय सल्ल्याने ते बाहेर पडतील. या मतदारसंघाची काळजी करु नका असे त्यांना सांगितले आहे. प्रचाराला कोण नेते येतील याचे नियोजन लवकरच, करण्यात येईल, असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

सगळ्यांशी चर्चा करुनच पक्षाने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. वातावरण चांगले आहे. बंडखोरी झाली असली तरी त्यांच्यासोबत चर्चा सुरु आहेत. त्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व कायकर्ते प्रचार करतील, कोरोना काळ असला तरी अनेक राज्यात निवडणुका सुरु आहेत. भाजपचे प्रशांत परिचारक आणि उमेदवार समाधान अवताडे दोघांनी एकमेकाविरोधात निवडणूक लढवली आहे. त्यांचे कार्यकर्ते एकत्र येतील असे वाटत नाही. त्या दोघांचे अनेक कार्यकर्ते भगीरथ भालके यांच्याशी संपर्क करत आहेत, असेही पाटील म्हणाले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनला विरोधातील जे वक्तव्य केले आहे ते बेजबदारपणाचे आहे. सर्वसामान्य माणसाला याचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊ. कोणताही निर्णय घेताना आम्ही तिन्ही पक्ष एकमताने निर्णय घेतो.आम्हा तिघात भांडण लावण्याचा प्रयत्न चंद्रकांत दादा आणि त्यांचे सहकारी करत आहेत. मात्र, त्यांना यश येणार नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.