दिपाली चव्हाण हत्त्या प्रकरणी वरिष्ठ वन अधिकारी विनोद शिवकुमार याला अटक

दिपाली चव्हाण हत्त्या प्रकरणी वरिष्ठ वन अधिकारी विनोद शिवकुमार याला अटक

अमरावती || मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गुगामल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी रात्री ८ आपल्या राहत्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चार पानांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी वरिष्ठ वन अधिकारी विनोद शिवकुमार याला जबाबदार धरले. त्यामुळे पोलिसांनी शिवकुमारला अटक केली आहे. पोलीस तपासात उपवनरक्षक विनोद शिवकुमार आणि दीपाली चव्हाण यांचे फोन रेकॉर्ड समोर आले आहे.

शिवकुमार रात्रीला गस्ती दरम्यान चव्हाण यांनी कुठेही बोलवून असभ्य बोलायचा. त्यांचे म्हणणे न ऐकल्यास हरीसालला आल्यावर कर्माचाऱ्यांसमोर तो चव्हाण यांना अपमानित करायचा. शिवकुमारच्या मर्जीने वागत नसल्याने दीपाली यांचे वेतन देखील रोखण्यात आले, मानसिक छळ केला. गर्भवती असताना घरी जाण्याची परवानगीही फेटाळून लावली होती, असे विविध आरोप दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात शिवकुमार विरोधात केले आहेत.

मूळच्या साताऱ्याच्या असणाऱ्या दीपाली चव्हाण या 2014मध्ये राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वन विभागात रुजू झाल्या होत्या. त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून धुळघट रेल्वे येथे पहिली नियुक्ती मिळाली होती. 2019 मध्ये त्यांची हरिसालला बदली झाली. हरिसाल वनपरिक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांच्या पुनर्वसनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांच्याकडे वनपाल, वनमजूर असा पुरेसा कर्मचारी वर्ग नसतानाही त्यांनी 'मांगीय' या गावचे पुनर्वसन केले. यादरम्यान आदिवासी बांधवांनी त्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांनी याबाबत विनोद शिवकुमारला माहिती दिली. मात्र, त्या खोटे बोलत असल्याचा आरोप करत दीपाली यांची मदत केली नाही. आदिवासी बांधवांच्या तक्रारीवरून दिपाली चव्हाण यांच्यावर अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यावेळी देखील शिवकुमारने मदत केली नाही.