आता या रुग्णांसाठीच रेमडेसिव्हिर वापरता येणार ; पुणे जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

आता या रुग्णांसाठीच रेमडेसिव्हिर वापरता येणार ; पुणे जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

पुणे || कोरोनाबाधित रुग्णावर कोणतीही कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत किंवा दहापेक्षा जास्त दिवसांपासून कोरोनाची लक्षणे आहेत. तसेच, सौम्य आजार आहे,अवयव निकामी झालेले असतील किंवा रेमडेसिव्हिरची एलर्जी आहे, अशा रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर करू नये, अशा सूचना पुणे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. रेमडेसिव्हिरची गरज असलेल्या रुग्णांनाच ते उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांमार्फतच रेमडेसिव्हिर देण्याचा निर्णय घेतला. परंतु खासगी रुग्णालयांनी त्याचा वापर कोणत्या रुग्णांसाठी करायचा, यावर जिल्हा प्रशासनाला नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. संबंधित रुग्णालयांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु काही रुग्णालयांकडून रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात गैरप्रकार होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच, सध्या रेमडेसिव्हिरची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत वाढत चालली आहे. खासगी रुग्णालयांमधील बेड्‌सच्या सुमारे ५० ते ६० टक्के हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येत होते. परंतु काही दिवसांपासून औषधी कंपन्यांकडून होणाऱ्या पुरवठ्यात घट होत आहे. या पार्श्वभूमीवर आता खासगी रुग्णालयांनी कोणत्या रुग्णांसाठी रेमडेसिव्हिरचा या इंजेक्शनचा वापर करावा, याबाबत जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

कोणत्या रुग्णाला वापरता येणार

  1. रुग्णाला सलग तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप
  2. ऑक्सिजनची पातळी ९२ पेक्षा कमी होणे
  3. क्ष-किरण अहवालामध्ये न्यूमोनिया आढळणे
  4. रक्तातील सायटोकाइन मार्कर्समध्ये तीनपट वाढ होणे
  5. छातीचा एचआरसीटी स्कोर ९ पेक्षा जास्त