पल्स पोलिओ लसीकरणापासून तालुक्यातील एकही बालक वंचित राहणार नाही - दत्तात्रय भरणे 

पल्स पोलिओ लसीकरणापासून तालुक्यातील एकही बालक वंचित राहणार नाही - दत्तात्रय भरणे 

इंदापूर 31// संपूर्ण देशात आज रविवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजलेपासून पल्स पोलिओ लसीकरण अभियानास सुरवात झाली आहे.इंदापूर तालुक्यातील लसीकरणाचा शुभारंभ इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तालुक्यातील एकही बालक आजच्या पल्स पोलिओ लसीकरणातून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदणशिवे,डाॅ.सुहास शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, कार्याध्यक्ष अतुल झगडे,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सुनिल गावडे,विरोधीपक्ष नेता नगरसेवक पोपट शिंदे,अनिकेत वाघ, स्वप्निल राऊत आदींसह रूग्णालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

इंदापूर तालुक्याची एकूण लोकसंख्या ३ लाख ६० हजार ४८९ असून शुन्य ते वय वर्षे पाच या गटातील अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या ३३ हजार ५५९ इतकी आहे. तर ऊसतोड मजुरांची संख्या ३ हजार ११४ असून शहरातील लाभार्थ्यांची संख्या ३ हजार ४१२ इतकी आहे. या सर्व लसीकरणासाठी तालुक्यात ३५० बुथ उभारण्यात आले आहेत.१२ मोबाईल टीम कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तर एकूण ट्रांझिट टीम ची संख्या ७ इतकी आहे. असे एकूण मिळून ३६९ गट यासाठी काम करणार आहेत.तालुक्यातील आठही प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रूग्णालय आणि ग्रामीण रूग्णालय,४४ आरोग्य उपकेंद्रात लसीकरण होणार आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सुनिल गावडे,तालुका आरोग्य कर्मचारी,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,स्वयंसेवक यांची टीप हे लसीकरण पार पाडणार आहेत. 

इंदापूर शहरासाठी लसीकरण सुलभ व्हावे याकरिता शहरात २५ बुथ उभारण्यात आलेले आहेत. ऊसतोड कामगरांच्या लसीकरणासाठी ८४४ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.नागरिकांनी या लसीकरणात स्वतः सहभागी होऊन आपल्या पाल्ल्याच्या निरोगी आयुष्यासाठी त्यास पल्स पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.