कर्मयोगीच्या कामगारांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ; दिला थेट इशारा

कर्मयोगीच्या कामगारांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ; दिला थेट इशारा

इंदापूर || कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना न्याय मिळाला पाहीजे यासाठी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून काबाडकष्ट करणाऱ्या कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी कर्मयोगी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चा काढणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिला आहे.

शुक्रवारी दि.11 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यास तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्याध्यक्ष अतुल झगडे, सुरेश शिंदे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, पिंपरी खुर्दचे माजी सरपंच नानासाहेब नरुटे आदी उपस्थित होते.

हनुमंत कोकाटे म्हणाले,की कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना हे इंदापूरचे वैभव आहे. या कारखान्यावरती इंदापूर तालुक्यातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. अनेकांचे प्रपंच याच्यावरती चालतात. गेल्या अनेक वर्षापासून हा कारखाना जोमात चालविण्यासाठी या कारखान्याचे कामगार रक्ताचे पाणी करून मेहनत घेत आहेत. स्वर्गीय शंकरराव पाटील यांनी शेतकरी व कामगारांचे हीत डोळ्यासमोर ठेवून आदर्शवादी कारखाना चालविला होता, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर हे कामगार कारखाना नेटाने चालविण्यासाठी आपला जीव ओतत आहेत.

परंतु कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्यानंतर आज कारखान्याची परस्थिती काय झाली आहे हे बघून खूप वाईट वाटते. गेल्या अनेक वर्षापासून जो अंधाधूंद कारभार या कामगारांच्या व सभासदांच्या वरती चाललेला आहे त्याला वाचा फोडल्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्पं राहणार नाही, कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देऊ.कर्मयोगीच्या कामगार बांधवांनी अपार मेहनत घेऊन कारखान्याच्या वाढीस मोठे योगदान दिले आहे. त्यांचे हे योगदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. वेळ पडलीच तर कामगारांच्या न्याय हक्कासाठी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कर्मयोगी कारखान्यावर मोर्चा काढू तसेच साखर आयुक्त गायकवाड यांच्याकडे तक्रार करून न्याय मिळवून देऊ असा सुचक इशारा तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कर्मयोगी ची पंचवार्षिक निवडणूक लढविणार …

पत्रकार परिषदेमध्ये कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना बिजवडी ची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी जाहीर केला.


 राष्ट्रवादी काँग्रेसने या मागण्या केल्या आहेत.

  • सन २०१७ पासून आज अखेर एकूण १२ पगार बाकी आहेत ते लवकरात लवकर जमा करावेत.
  • हंगामी कामगारांना ५ वर्षाचे रेटीशन देणे बाकी आहे ते द्यावे.
  • एकूण ९ महिन्यांचा महागाई भत्ता बाकी आहे तो तात्काळ देण्यात यावा.
  • दोन- तीन वर्षात कुठल्याही प्रकारची इंक्रीमेंट नाही ते देण्यात यावे.
  • कामगार पतसंस्था बंद पडली आहे, तरीही वसुली चालु आहे,परंतु कामगारांना कुठल्याही प्रकारचे कर्ज दिले जात नाही,त्यामुळे पगार नसल्याने थकीत वसुली थांवबवण्यात यावी तसेच कुठल्याही प्रकाराचा डिव्हीडंट दिला जात नाही याची चौकशी ए.आर. कार्यालयाने करावी.
  • १०० ते १५० कामगारांना माफीनामा /राजीनामा का लिहून घेतला आहे त्याचे कारण काय ?
  • प्रत्येक कामगाराच्या खात्यावर 3 लाख रूपये कर्ज व त्याचे ९९ हजार व्याज भरणार कोण व कधी भरले जाणार? 
  • निवृत्त कर्मचाऱ्यांना वन टाईम ग्रॅज्युइटी मिळाली पाहीजे.