फिस्कटलं ! बावीस गावांच्या पदरी पुन्हा निराश्याचं ; 22 एप्रिलचा आदेश रद्द

फिस्कटलं ! बावीस गावांच्या पदरी पुन्हा निराश्याचं ; 22 एप्रिलचा आदेश रद्द

इंदापूर || उजनी धरणात येणाऱ्या सांडपाण्यापैकी 5 टी.एम.सी.पाणी उचलून इंदापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त बावीस गावांना देण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्याने एक योजनेच्या प्रस्तावास मंजूरी मिळवली होती. 22 एप्रिल रोजी जलसंपदा खात्याने या योजनेच्या सर्व्हेक्षणाला प्रत्यक्ष मंजुरी दिली. मात्र अवघ्या महिन्याच्या आतचं हा आदेश रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातील बावीस गावांच्या पदरी निराश्याच पडली आहे.

या योजनेमुळे तालुक्यातील बावीस गावांना जादा पाणी मिळून या गावातील शेती आणखी हिरवीगार होणार होती.शेतकऱ्यांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबून शेतीत सोनं पिकेल अशी भोळी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र एका महिन्याच्या आतचं ही योजना सध्यातरी गुंडाळावी लागली असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी आहे.

उजनीतील सांडपाण्याच्या 5 टी.एम.सी. सर्वेक्षणाचा आदेश रद्द

उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवले जात असल्याचा आरोप होत होता. यावरुन इंदापुरचे आमदार तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात सोलापुरात अनेक आंदोलनंही झाली. सोलापुरातल्या लोकप्रतिनिधींनीही याला मोठा विरोध केला. त्यानंतर आज (18 मे) अखेर जयंत पाटील यांनी तो आदेश रद्द केला आहे.यावेळी त्यांनी संबंधित आदेश केवळ सर्वेक्षणाचा होता. मात्र, त्याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याने आदेश रद्द केल्याचं मत व्यक्त केलं.

इंदापूरकरांना पाणी देण्यास सोलापूर करांचा कडाडून विरोध 

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय  शिंदे, यशवंत माने यांच्यासह शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. सोलापूर जिल्ह्याच्या सध्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी भूमिका मांडली. सोलापूर जिल्ह्याच्या उजनीच्या जलाशयातून पाणी सोलापूर जिल्ह्याला वाटप केलेले आहे. त्यातल्या एकाही थेंबाला धक्का लागणार नाही. शासनाकडून 22 एप्रिलला एक सर्वेक्षणाचा आदेश निघाला होता. त्याबाबत बरेच गैरसमज झालेले आहेत. त्यामुळे मी ते आदेश रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.असं जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले 

मंत्री भरणे बावीस गावांचा पाणी प्रश्न कसा सोडवणार ? 

राज्यमंत्री भरणे यांनी 2019 च्या निवडणूकीत इंदापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतीला बारमाही बागायत करणे हा एकमेव मुद्दा हाती घेतला. गेल्या दिड वर्षात त्यांनी आपला बराचसा वेळ याच मुद्द्यावर खर्ची केला.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित दादा व सुप्रिया सुळे यांच्या मदतीने त्यांनी तशी पावले ही टाकली. मात्र याच मुद्यावरुन सोलापूरात जनाक्रोश उफळला आणि एका महिन्यातचं याला खो बसला. 

तालुक्याच्या पाणी प्रश्न सोडवणे हा माझ्यासाठी महत्वाचे असून आता केवळ यावरचं काम करायचे आहे असं भरणे यांनी वारंवार बोलून दाखवले. मात्र विरोधकांच्या एकजूटीपुढे भरणे यांना सध्या तरी दोन पाऊन मागे यावे लागले आहे.उजनी सांडपाणी उचल योजनेचा काढण्यात आलेला सर्व्हेक्षणाचा आदेश रद्द केल्यानंतर बोलाचाचं भात आणि बोलाचीचं कडी यातला हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया  आता शेतकरी वर्गातून उमटू लागल्या आहेत.तर राज्यमंत्री भरणे आता यासाठी नवी कोणती योजना आखणार ? पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी  कोणती वेगळी रणनिती आखणार का ? अशा चर्चा रंगल्या आहेत.