तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही - छत्रपती उदयनराजेंचा सरकारला इशारा

तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही - छत्रपती उदयनराजेंचा सरकारला इशारा

सातारा दि.28 // सर्वोच्च न्यायालयाने  मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज पहिल्यांदाच सुनावणी पार पडणार होती. मात्र सरकारी वकील उपस्थित नसल्याने काही काळ कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही ही बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच सरकार आणि वकिलांमध्ये कसलाही समन्वय नाही, असेच सिद्ध होत आहे.मराठा समाजाच्या उद्रेकाचा बांध फुटायची वेळ आता आली आहे. या उद्रेकाची सरकार वाट पाहतेय की काय? जर मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसेल तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खासदार उदयनराजे भोसलेंनी ठाकरे सरकारला दिला आहे.

मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलल्यामुळे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले कि, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे याचा सरकारने तात्काळ जाहीर खुलासा करावा. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, महाराष्ट्र  सरकारचा वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा सुनावणी झाल्यावर, कोर्टाने ही सुनावणी ४ आठवडे पुढे ढकलली. मात्र गेले दोन आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असतानासुद्धा सरकारने जाणीवपूर्वक तयारी केली नाही असा आरोप उदयनराजेंनी केला आहे.