धुराडे पेटले पुढे काय?  

धुराडे पेटले पुढे काय?  

इंदापूर तालुक्यात साठ ते बासष्ट हजार एकर ऊसाचे क्षेत्र यावर्षी गाळपासाठी उभे आहे.कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचा तीस हजार एकर,नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचा आणि छत्रपती सहकरी साखर कारखान्याचा वीस हजार एकर असे  एकूण ऊस क्षेत्र उपलब्ध आहे. आॅक्टोबर महीन्याची सुरवात होत असताना कारखान्याचे बाॅयलर पेटलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कारखाने दस-या नंतर सुरु होतील असे चिन्ह दिसत आहे. हे चित्र दिसत असले तरी ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. मध्यंतरी पुण्यातील साखर संकुलात ऊस तोडणी कामगारांच्या संघटना आणि साखर संकुलाचे संचालक मंडळ यांच्यात चर्चा झाली. परंतु ठोस निर्णय पुढे आला नाही. कारखाना स्थळावरती ऊस तोडणी कामरांच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

तालुक्यातील तीनही कारखाने आपापल्या कारखाना स्थळावर कामगारांना कोणत्या सुविधा देणार हे जाहिर केलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील कारखाने कधी सुरु होणार हा प्रश्न उपस्थित होतो. कारखान्यांचे देखभाली ची कामे पूर्ण होऊन बाॅयलर प्रज्वलन झाले म्हणजे कारखाना सुरु होण्यास सज्ज झाला असा अर्थ होतो.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय उपाययोजना केली जाईल. त्याची अंमलबजावणी कशी होणार? या सर्व बाबीचा गांंभिर्याने विचार होणे आवश्यक आहे. 

ऊस क्षेत्रामध्ये ऊसाची तोडणी करताना किती मजूरांची संख्या असेल त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाईल का?  हा प्रश्न हात जोडून उभा राहतो. कोरोनाचा विळखा वाढत असताना ऊस तोडणी कामगार कारखान्यावरती येणार आहेत का? त्यांची संख्या किती आहे. हे अद्याप राज्यशासनाने किंवा साखर संघाकडून समजले नाही. त्यामुळे भविष्यात कोटा पद्धतीने ऊस तोडावा लागेल कि काय अशी गंभीर निर्माण होण्याचा संभव आहे. ही परिस्थिती तीनही कारखान्यात जर निर्माण झाली तर स्थानिक मजूरांना कोटा पद्धतीने ऊस तोडावा लागेल किंवा हार्वेस्टर मशीनने ऊस तोडावा लागेल. परंतु तालुक्यातील तिनही कारखान्यांचे क्षेत्र लक्षात घेतले तर एवढ्या क्षेत्राची ऊस तोडणी होईल का? असे अनेक प्रश्न उभे आहेत. अठरा लाख मेट्रीक टन ऊस गाळपास तालुक्यातून उपलब्ध होईल या वर्षीचे पर्जन्यमान पाहता यदा कदाचित टनेज मध्ये वाढ होईल. तीनही करखान्यांना हा ऊस गाळणे शक्य दिसत नाही.त्यामुळे नेहमीप्रमाणे इतर कारखाने ऊसाची पळवापळवी करणार से वाटने नवलचं ठरेल. कारण इतर कारख्याकडेही यंदा ऊस मुबलक आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यात शेतक-यांचा ऊस कोणता कारखाना गाळपाला घेऊन जाणार हा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होईल. कदाचित शेतकरी संघटना या विषयावर आंदोलने छेडतील असा अंदाज आहे. ऊसाची उपलब्धता तीन सहकारी व दोन खाजगी कारखान्यांना मुबलक पुरवठा होऊन ऊस शिल्लक राहील अशी चिन्ह आज दिसून येत आहेत. जर सहकारी साखर कारखान्यांचे योग्य नियोजन झाले तर या वर्षी राज्यात तालुक्यातील कारखान्यांचे उच्चांकी गाळप होईल. आज मितीस धुराडे पेटले पण शेतक-यांचे भविष्य कसे असेल असा प्रश्न शेतकरी वर्गात विचारला जात आहे.