कर्मयोगीची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन संपन्न

कर्मयोगीची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन संपन्न

इंदापूर // कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन कॉन्फरन्सिंगव्दारे कोरोनाचे सर्व नियम पाळून कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांचे अध्यक्षतेखाली व कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पद्मा भोसले तसेच सर्व संचालक मंडळ, निरा-भिमा सह. साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे यांचे उपस्थितीमध्ये तसेच सभासदांचे ऑनलाईन उपस्थितीव्दारे उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाली.

विषयपञिकेवरील विषयांचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी केले. व त्यास सभासदांनी हात वर करून मंजुरी दिली.विषयपञिकेवरील सर्व विषयांचे मंजुरीनंतर सभासदांनी कारखान्यासाठी काही विधायक सुचना केल्या. त्यानंतर कारखान्याच्या उपाध्यक्षा  पद्मा भोसले यांनी सन 2019-20 मधील गाळप हंगामाचा सविस्तर आढावा सादर केला व गाळप हंगाम यशस्वी करणेसाठी ऊस उत्पादक सभासद, वाहतुकदार, ऊसतोडणी कामगार, कारखान्याचे कामगार व अधिकारी यांनी केलेल्या प्रयत्नाबददल आभार मानले.

कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रशासनाचे इथेनॉल व साखर निर्यात धोरणासंदर्भात विशेष अभिनंदन करुन केंद्रसरकारकडे समक्ष भेट घेवून आणखी मागण्या करणार असलेचे त्यांनी सुचित केले. त्यामध्ये विशेषत: इथेनॉलचे धोरण दहा वर्षासाठी आहे ते पंचवीस वर्षाचे करणेत यावे, पेट्रोलमध्ये सध्या 10 टक्के इथेनॉल मिसळले जाते ते प्रमाण 20 टक्के करणेत यावे, सध्या इथेनॉल फक्त पेट्रोलमध्ये मिसळले जाते ते डिझेलमध्ये मिसळण्याचेही धोरण करावे व तशा प्रकारची वाहननिर्मिती करावी अशा सुचना वाहननिर्मिती करणा-या वाहन कंपन्यांना करण्यात याव्यात, इथेनॉल डिलीव्हरी व पेमेंट त्वरीत व्हावे, इत्यादी मागण्या पुढील आठवडयात केंद्रसरकारमधील संबंधीत केंद्रीय मंञी व अधिकारी यांना समक्ष भेटून करणार असलेचे त्यांनी सांगितले.त्यानंतर सर्व उपस्थितांचे आभार कारखान्याचे संचालक राहूल जाधव यांनी मानले व राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.