इंदापूर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या कारणास्तव केला रास्ता रोको ; या आहेत प्रमुख मागण्या

इंदापूर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या कारणास्तव केला रास्ता रोको ; या आहेत प्रमुख मागण्या

इंदापूर || माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी माऊली चवरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध मागण्यासाठी इंदापूर-बारामती रस्त्यावर शेळगाव फाटा येथे बुधवारी (दि.4) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

शेळगाव ते निमगाव रस्त्यावरील पूल दुरुस्त करावा व पर्यायी रस्ता द्यावा. कडबनवाडी- शेळगाव- रुई रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रू.4 कोटीचा निधी दिलेल्या रस्त्याचे संपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, कडबनवाडी येथील चिंकारा अभय वन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी रद्द करण्यात यावे तसेच शेळगाव येथील संत मुक्ताबाई मंदिरासमोर 100 वर्षांपूर्वीची धोकादायक इमारत आहे, ग्रामस्थांनी ठराव करून देखील इमारत न पाडणाऱ्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या या रास्ता रोको आंदोलन याप्रसंगी करण्यात आल्या. निमगाव केतकीचे मंडल अधिकाऱ्यांनी या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

शासनाने वरील मागण्यांची तातडीने दखल घेऊन पूर्तता करावी अन्यथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी बोलताना माऊली चवरे व इतर भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

या रस्ता रोको आंदोलनामध्ये विठ्ठल जाधव, मोहन दुधाळ, भागवत भुजबळ, धनाजी ननवरे, आकाश कांबळे, पांडुरंग शिंदे, राजकुमार जठार, आबासाहेब थोरात, ललित होले, शिवाजी शिंगाडे, राहुल जाधव व भाजपचे कार्यकर्ते, ग्रामस्थ सहभागी झाले होते.