लोकशाही रुजवणारा खरा तारा निखळला ; गणपतराव देखमुखांच्या आठवणींना हर्षवर्धन पाटलांकडून उजाळा…

लोकशाही रुजवणारा खरा तारा निखळला ; गणपतराव देखमुखांच्या आठवणींना हर्षवर्धन पाटलांकडून उजाळा…

इंदापूर || विधिमंडळ जे कायदेमंडळ आहे त्या सभागृहामध्ये रोजगार हमी योजना कायदा व इतर अनेक लोकोपयोगी कायदे निर्माण करण्यामध्ये गणपतराव देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे. विधिमंडळाचे त्यांनी सलग अकरा  वेळा प्रतिनिधित्व करीत संसदीय लोकशाही कशी सांभाळायची याचा आदर्श घालून देणारे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते, आज त्यांच्या जाण्याने लोकशाही रुजवणारा खरा तारा निखळला आहे अशा शब्दा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला.

विधिमंडळाच्या सभागृहामध्ये गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांनी सकारात्मक व  विकासात्मक भूमिकेतून कामकाज करीत राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले. सभागृहांमध्ये संसदीय प्रथा व परंपरांचे त्यांनी कायमच पालन केले तसेच विरोधासाठी विरोध कधीच केला नाही. या गुणवैशिष्ट्यांमुळे गणपतराव देशमुख हे संसदीय लोकशाहीतील पितामह होते,असे म्हणत त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कर्मयोगी शंकररावजी पाटील व गणपतराव देशमुख यांनी विधिमंडळात अनेक वर्षे  एकत्र काम केले.

ते पुढे म्हणाले, सांगोला व इंदापूर यांचे वेगळे नाते होते. माझे काका कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ ) व गणपतराव देशमुख (आबा) यांनी विधिमंडळात अनेक वर्षे  एकत्र काम केले. गणपतराव देशमुख हे रोजगार हमी व पणन खात्याचे मंत्री होते. या खात्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी मंत्रिमंडळात हे खाते सांभाळल्यानंतर माझ्याकडे रोजगार हमी व पणन खाते माझ्याकडे आले. या खात्याचा त्यांनी  चेहरामोहरा बदलला होता. शेतीच्या पाणी प्रश्नाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. सांगोला सारख्या दुष्काळी भागाला पाणी मिळावे म्हणून टेंभू, म्हैसाळ आदी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.

पक्ष, नेता व संघटनेवर कशी निष्ठा असावी, याचे उदाहरण म्हणजे गणपतराव देशमुख होत.ते  राज्याचे पणनमंत्री असताना इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमासाठी आले होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले गणपतराव देशमुख यांची राज्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशी ओळख होती. त्यांच्या जाण्याने राज्याचे नुकसान झाले आहे, असा नेता पुन्हा होणे नाही, या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.