विषारी औषध टाकल्याने पाच टन माशांचा मृत्यु ; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

विषारी औषध टाकल्याने पाच टन माशांचा मृत्यु ; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

इंदापूर || पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिमा नदीकाठच्या पळसदेव- शेलारपट्टा परिसरातील संजय एकनाथ शेलार यांच्या शेततळ्यातील सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.रूपचंद जातीचे हे मासे अज्ञाताने विषारी औषध पाण्यात टाकून मारल्याचा त्यांना संशय असून,त्यांनी इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

याबाबत शेलार यांनी माहिती दिली की, शेलारपट्टा परिसरातील आमच्या दोनशे बाय शंभर लांबी-रुंदीच्या शेततळ्यामध्ये आम्ही आठ महिन्यांपूर्वी रूपचंद जातीचे सुमारे तीस हजार बीज सोडले होते. सध्या या माशांचे वजन अडीचशे ते सातशे ग्रॅम इतके झाले आहे.

मात्र, रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञाताने पाण्यात विषारी औषध टाकल्याने सुमारे ५ टनांहून अधिक मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे. सकाळी माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या बाजारात हे मासे ९० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे आमचे पाच लाखांचे नुकसान झाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.