भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला आग ; दहा नवजात बालकांचा मृत्यू

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला आग ; दहा नवजात बालकांचा मृत्यू

भंडारा 09 // जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनीटमध्ये  ( SNCU ) शॉर्ट सर्किटने आग लागल्याने  दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शिवाय त्यांनी या घटनेच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले आहेत.

शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बाॅर्न युनिट मधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. या शिशु केअर युनीटमधील सात बालकांना वाचविण्यात आले आहे. 

ही घटना कळताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपर्क केला. शिवाय या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये आउटबॉर्न आणि इन बाॅर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटर मध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले. तर आऊट बाॅर्न  युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला.शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. आग लागली तेव्हा रूग्णालयात अन्य रूग्ण ही मोठ्या प्रमामात होते. त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे ही जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. आग नक्की कशामुळे लागली याबाबत चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.