इंदापूर नगरपरिषदेचे आगळे वेगळे रक्षाबंधन ; औषधी वनस्पतीच्या वृक्षाला बांधली पर्यावरण पूरक राखी

इंदापूर नगरपरिषदेचे आगळे वेगळे रक्षाबंधन ; औषधी वनस्पतीच्या वृक्षाला बांधली पर्यावरण पूरक राखी

इंदापूर || रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा सणाचे औचित्य इंदापूर नगरपरिषदेने आगळे वेगळे रक्षाबंधन साजरे केले.रविवारी दि.22 रोजी बायोडायव्हर्सिटी येथे लावलेल्या औषधी वनस्पती म्हणून ओळख असलेल्या काटेसावर या वृक्षाला नैसर्गिक व पर्यावरण पूरक अशी तयार केलेली राखी नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते बांधून रक्षाबंधन साजरे केले.

विशेष म्हणजे ही पर्यावरण पूरक अशी राखी बनवण्यात आली होती. यासाठी पारिजातकाची पाने, गुलाब ,लीली , बीट्टी व इतर फुलांचा पानांचा वापर करण्यात आला होता.

यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरपरिषदेचे सभा अधीक्षक गजानन पुंडे, वृक्ष मित्र वासुदेव शिरसाट, चंद्रकांत देवकरणम,सहाय्यक आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ, वीज विभाग सुपरवायझर दीपक शिंदे, अल्ताफ पठाण, उद्यान प्रमुख अशोक चिंचकर व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अंकिता शहा म्हणाल्या की,रक्षाबंधन म्हणजे जेव्हा केव्हा आपल्या बहिणीवर संकटे येतील तेव्हा भावाने तिचा रक्षक म्हणून तिचे संरक्षण करण्याचे हे बंधन असते.  त्यामुळे या सणाला रक्षाबंधन म्हणून हा उत्सव आपण सर्वजण साजरा करत असतो. त्याच प्रमाणे आजच्या परिस्थितीला जंगले नष्ट होऊन, आज सिमेंटचे जंगली तयार होत आहेत. खूप प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे पर्यावरणाला अत्यंत धोका निर्माण झालेला आहे.त्यामुळे आज झाडे लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.झाड आपल्याला उन्हापासून संरक्षण करून गार सावली देते पाने,फुले फळे तसेच औषध देते. महत्त्वाचे म्हणजे ऑक्सिजन चा पुरवठा करते. झाडे त्याची जबाबदारी मोठ्या कष्टाने पार पाडत आहेत.परंतु आपण  वृक्षतोड करून त्याच्यावर तसेच्या पर्यावरणावर संकटे आणत आहोत. ते जसे आपल्याला निस्वार्थीपणे कोणताही मोबदला न घेता सेवा देतात आपण ही त्याची उतराई करावी.

यासाठी या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या घराच्या दारात किंवा परिसरात जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे. त्यामुळे आपल्या शहरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढून आपल्या सर्वांचे आरोग्य सुदृढ होईल.यामुळे शहरवासीयांना ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात मिळेल शिवाय आपले इंदापूर शहर हरित होईल.