डॉ.बाबासाहेब आंबेडकर समस्त मानव जातीचे प्रेरणास्रोत - माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समस्त मानव जातीचे प्रेरणास्रोत - माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे

इंदापूर || डॉ. बाबासाहेबांनी कष्ट आणि संघर्षातून प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत अनेक पदव्या मिळवून विविध विषयांचा सखोल अभ्यास केला. आपल्या वाचनाने, चिंतनाने आणि लेखनातून प्रचंड शक्ती उभी केली, ह्या प्रखर संपत्तीच्या/ शक्तीच्या जोरावरच बाबासाहेबांनी बहुजन समाज सर्वशक्तीनिशी जागा केला.त्याला मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. आत्मसन्मान, स्वाभिमान आणि सन्मानाची जाणीव बाबासाहेबांनी करून दिली. म्हणून बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने समस्त मानव जातीचे प्रेरणास्रोत आहे, अशा शब्दांत माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी डॉ. आंबेडकर  यांना जयंतीदिनी अभिवादन केले.

मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस गलांडवाडी नं.२ चे माजी सरपंच श्री.गोपीचंद गलांडे व संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.

रत्नाकर मखरे म्हणाले की,१४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे महत्त्व अद्वितीय आहे. उपेक्षित,वंचित, शोषित,पीडित आणि समस्त मानव जातीच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस १४ एप्रिल हा होय.माजी सरपंच श्री. गोपीचंद गलांडे यांनी उपस्थितांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.यावेळी सामूहिकरित्या बुद्ध वंदना (पंचशील, त्रिशरण) घेण्यात आली.तदनंतर बाबासाहेबांच्या जयजयकाराच्या घोषणा देत, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. 

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी (मामा) मिसाळ, सचिव ॲड.समीर मखरे, संचालक राहुल सवणे, श्रीम.शकुंतला मखरे, कु.अनार्या मखरे, सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे, गोरख तिकोटे, गोरख चौगुले व संस्थेतील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्राचार्या सविता गोफणे यांनी केले,तर सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रम मुख्याध्यापक साहेबराव पवार व प्राचार्या अनिता साळवे - मखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सदर कार्यक्रम स्थळी कोविड- १९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली.