बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्यास रुग्णालयांवर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्यास रुग्णालयांवर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे || कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना सरसकट सर्व रुग्णांच्या नातेवाईकांकडे रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी करता कामा नये, असे सांगून रेमडेसीवीरबाबतीत गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करुन दोषी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याबरोबरच काही रुग्णालये बिला साठी मृतदेह अडवून ठेवल्याचे आढळल्यास अशा रुग्णालयांवरही कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

पुण्यातील  कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सुनील टिंगरे, आमदार अशोक पवार, आमदार संजय जगताप, आमदार अतुल बेनके, आमदार माधुरी मिसाळ, आमदार मुक्ता टिळक, आमदार सिध्दार्थ शिरोळे तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन योग्य नियोजन करा

कोरोना’च्या संभाव्य 'तिसऱ्या लाटे'ची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावे, अशा सूचना देऊन या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करा,असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासकीय यंत्रणेला दिले. 

‘कोरोना’ प्रतिबंधक लसीकरण जलदगतीने होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 45 वर्षांवरील नागरिकांबरोबरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी राखून ठेवण्यात आला आहे. परंतू सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण सुरळीतपणे होईल. पहिली लस घेतलेल्या नागरिकांना दुसरी लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

औषधे, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड, रेमिडिसिवीरसह आरोग्य सुविधांची तयारी करा.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी स्वतः हून नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.  ऑक्सिजन युक्त व व्हेंटिलेटरयुक्त उपलब्ध खाटा, उपलब्ध लस याविषयी समन्वय ठेवून नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी केले.

लहान मुले बाधित झाल्यास त्यांच्यावर उपचार होण्यासाठी सर्व उपाययोजना करा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना वैद्यकीय सेवा सुविधा अपुऱ्या पडू नयेत, याची दक्षता घेऊन काटेकोरपणे नियोजन करा,असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व शासकीय यंत्रणेला दिले. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमिडिसिव्हीर इंजेक्शन आदी वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तयारी करा, असेही त्यांनी सांगितले.