इंधन दरवाढीवरुन काँग्रेस आक्रमक ; सायकल वरुन विधानभवन गाठत नोंदवला केंद्र सरकारचा निषेध

इंधन दरवाढीवरुन काँग्रेस आक्रमक ; सायकल वरुन विधानभवन गाठत नोंदवला केंद्र सरकारचा निषेध

मुंबई 01 // पेट्रोल डिझेल मध्ये होणाऱ्या दरवाढी वरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व मंत्री आणि आमदारांनी सायकलवरून विधानभवन गाठत  इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. यावेळी केंद्र सरकार विरोधात विधानसभवनात घोषणाबाजीही करण्यात आली.

काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेते आज सकाळी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमला. यावेळी त्यांच्या हातात इंधन दरवाढीचे निषेध नोंदवणारे फलक होते. त्यावर, ‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असा मजकूर लिहिलेला होता. यावेळी काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर सायकलवरून विधानभवनाच्या दिशेने प्रवास सुरू केला. यावेळी नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे सर्वच आमदार उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. इतिहासात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. काँग्रेस सरकारांनी उभारलेले सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग विकण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला आहे. यासोबतच पेट्रोल, डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर लावून जनतेची लूट सुरु आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड प्रमाणात वाढवल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना संकटाच्या काळात लाखो लोकांच्या नोक-या गेल्या आहेत. अनेकांना मोठ्या वेतनकपातीचा सामना करावा लागतो आहे. छोटे व्यापारी, लघु व मध्यम बंद झाल्याने अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यातच इंधन आणि गॅस दरवाढीमुळे या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधनावरील अन्यायी करवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे.