ग्रामपंचायत कांदलगाव कडून सामाजिक उपक्रमातून  शिवजयंती साजरी 

ग्रामपंचायत कांदलगाव कडून सामाजिक उपक्रमातून  शिवजयंती साजरी 

इंदापूर 19 // ग्रामपंचायत कांदलगावच्या वतीने सामाजिक. उपक्रमातून शिवजयंती साजरी करण्यात आली. सरपंच रविंद्र पाटील व उपसरपंच बाळू गिरी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.विशेष म्हणजे शिवजन्मोहत्सवाच्या मुहूर्तावर महिला बचत गटांना कागदी पिशव्या बनवण्याच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य उल्हास पाटील,किसन सरडे,विजय सोनवणे,रेखा बाबर,तेजमाला बाबर,कोंडाबाई जाधव,सुवर्णा तुपे, कमल राखुंडे ,निलोफर पठाण,दशरथ बाबर,शिवाजी राखुंडे,दाजी साखरे,सिद्धेश्वर कोळी,विनोद भोसले,समाधान जगदाळे,संजय तुपसौंदर,तंटामुक्ती अध्यक्ष गणेश पाटील,पोलीस पाटील शैलजा पाटील यांसह ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

वृक्षारोपनातून हरित ग्राम करण्याच्या उद्देशाने गावातील महिलांना ३९१ रोपांचे वाटप करण्यात आले.दिलेले झाड लावून ते जगवण्याचा निर्धार सर्व महिलांनी याप्रसंगी केला. कांदलगाव ग्रामपंचायतीला सन २०१९-२० यावर्षीचा स्मार्टग्राम पुरस्कार मिळाल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सरपंच पाटील म्हणाले की,शिवरायांच्या विचारांचे सुराज्य घडवण्यासाठी सर्वप्रथम महिला सक्षम झाल्या पाहिजेत,तरच समाजाचा सर्वांगीण विकास होईल. तसेच प्लास्टीक मुक्तीच्या दिशेने एक शाश्वत पाऊल म्हणून बचतगटांना कागदी पिशवी बनवण्याचे प्रशिक्षण आज शिवजयंतीचे औचित्य साधून देत आहोत.सदरचे प्रशिक्षण ओम ग्रामण्यै प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे.याचा प्रशिक्षणार्थींनी लाभ घेऊन स्वतःचा उद्योग उभारावा. हे प्रशिक्षण दहा दिवसांचे असून या प्रशिक्षणासाठी क्रांती महिला बचतगट,जागृती ,उन्नती, महालक्ष्मी महिला बचतगट या गटांची निवड करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

यावेळी प्रशिक्षक सुयोग सावंत व निर्मला जाधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन पांडुरंग इंगळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष बाबर यांनी प्रयत्न केले.