ब्रेकिंग || उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी ; बावीस गावातील शेती होणार हिरवीगार

ब्रेकिंग || उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी ; बावीस गावातील शेती होणार  हिरवीगार

इंदापूर || इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेती सिचंन व निरा डावा कालव्यावरील बावीस गावांतील शेतीसाठी उजनी जलाशयातुन पाच टीएमसी पाणी उचलण्यास राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे. इंदापूर तालुक्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याने बावीस गावातील शेती आता हिरवीगार होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नियोजनानाखाली गेल्या काही वर्षांपासून मंत्री भरणे यांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरु होता.या प्रस्तावावर दि.२२ एप्रिल रोजी उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांची स्वाक्षरी झाली असून जलसंपदा मंत्रालयाने याबाबत शासन निर्णय पारित केला असल्याची माहिती जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोशल मिडियाव्दारे दिली आहे.

खडकवासला कालव्यावरील शेटफळगढे पासुन बेडशिंगे पर्यंत ३६ गावांना उन्हाळी आवर्तनात शेतीला पाण्याची तीव्र  टंचाई निर्माण होत होती. याशिवाय निरा डावा कालव्यावरील २२ गावांचा पाणी प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबीत होता.इंदापूर विधानसभेच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणूकीत बावीस गावचा पाणी प्रश्न हा कळीचा मुद्दा होता. हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी मंत्री भरणे यांचा पाठपुरावा चालू होता. वारंवार या योजनेवरुन भरणे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले होते.मात्र आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली असल्याने एकूणच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने तालुक्यातील वर्षानुवर्ष गाजत असणारा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागणार असून बावीस गावातील शेतकऱ्यांची गेली अनेक वर्षे अपुरी असणारी स्वप्न आता साक्षात्कारात उतरणार आहेत.

उजनी जलाशयातुन उचलपाणी करुन खडकवासला कालव्यात टाकले जाणार…

कुंभारगांव परिसरातील उजनी जलाशयातुन १० हजार एच.पी. क्षमतेच्या विद्युत पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे. ते पाणी सुमारे १० कि.मी. अंतरावरील शेटफळगढे परिसरातील खडकवासला कालव्यात टाकले जाणार आहे. तेथुन हे पाणी खडकवासला कालव्यातुन बेडसिंगे पर्यंतच्या शेती सिंचनासाठीही पाणी वापरले जाणार आहे. सणसर जोड कालवातुन नीरा डाव्या कालव्यावरील बावीस गावातील शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे. दोन्ही कालव्यावरील सुमारे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार असून सदर योजनेसाठी सुमारे ६०० कोटी रुपये खर्च येणार आहे. तर हि योजना पूर्ण होण्यासाठी दोन वषार्चा कालावधी जाणार आहे.