अखेर संजय राठोड यांनी दिला पदाचा राजीनामा ; म्हणाले …

अखेर संजय राठोड यांनी दिला पदाचा राजीनामा ; म्हणाले …

मुंबई  28 // पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. 

मी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.मी फक्त मंत्रिपद सोडलं आहे आमदारकीचा राजीनामा दिला नाही. पूजा चव्हाणच्या मृत्यूप्रकरणावरून विरोधकांनी अत्यंत घाणेरडं राजकारण केलं आहे. या प्रकरणात आमच्या समाजासह  माझी वैयक्तिक बदनामी करण्यात आली. तसेच मला राजकीय जीवनातून उठवण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.गेल्या 30 वर्षांपासूनची माझी राजकीय कारकिर्द उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करण्यासाठी मी मंत्रिपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे, असे संजय राठोड म्हणाले आहेत. 

कोणतीही चौकशी न करता विरोधकांकडून माझ्या राजीनाम्याची मागणी केली हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अवमान आहे. हे लोकशाहीच्या विरोधात असून मी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती, ती अत्यंत चुकीची आहे, असंही राठोड यांनी सांगितले आहे.