शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व ट्रॉली चोरणारे गुन्हेगार भिगवण पोलिसांच्या ताब्यात ; मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व ट्रॉली चोरणारे गुन्हेगार भिगवण पोलिसांच्या ताब्यात ; मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

भिगवण || काही दिवसापूर्वी भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील खारतोडे वस्ती - पोंधवडी येथील महिला शेतकरी अलका नामदेव खारतोडे यांचा खारतोडे वस्ती पोंधवडी परिसरातून महिंद्रा कंपनीचा अर्जुन 555 या मॉडेलचा ट्रॅक्टर चोरीस गेला आहे. या संदर्भात त्यांनी भिगवण पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास भिगवण पोलीसांकडून सुरु होता,पोलीसांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अअसणाऱ्या टोलनाक्यावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरा फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध लावण्यात यश आले असून आरोपी सुनिल बिभीषण देवकाते वय 25 रा. ऐरले ता. बार्शी जि. सोलापूर व महादेव नागेश सलगर रा.उटेगांव ता. बार्शी जि. सोलापूर यांना अटक केली आहे. 

सदर आरोपींनी मौजे पोंधवडी ता.इंदापूर येथील अलका खारतोडे यांचा ट्रॅक्टर तसेच इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन ट्राॅली चोरून नेलेबाबतची कबुली दिली आहे. त्यांचे ताब्यातून दोन ट्रॅक्टर व दोन ट्राॅली असा एकूण 11 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सदर कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस - पाटील,पो.ना.लोंडे, पो.कॉ.उगले, पो.कॉ.माने यांनी केली आहे.