गिरणी कामगार, कष्टकरी व उपेक्षित वर्गासाठी अण्णाभाऊंनी आपले आयुष्य वेचले - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

गिरणी कामगार, कष्टकरी व उपेक्षित वर्गासाठी अण्णाभाऊंनी आपले आयुष्य वेचले - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर || लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य महान आहे.त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.  संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते प्रणेते आहेत. गिरणी कामगार, कष्ट करणारा वर्ग, उपेक्षित वर्ग, मजूर वर्ग हे आपले दैवत मानून त्यांच्या विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. सर्व समाजाला एकसंघ करून समाजाच्या उन्नतीसाठी अण्णाभाऊंनी आयुष्यभर प्रयत्न केले,असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.1) रोजी व्यक्त केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटीने अण्णाभाऊ साठेनगर येथे आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते.

ते म्हणाले,की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याकडे विश्व कीर्तीचे रत्न म्हणून पाहिले जाते. दिड दिवसाची शाळा, जन्मगावापासून मुंबईपर्यंतची पायी यात्रा, अनेक कादंबऱ्या, पोवाडे, समाज प्रबोधन करण्याचे त्यांचे कार्य अद्वितीय आहे फकीरा कादंबरी घराघरात पोहचली आहे. रशिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी अजरामर केले आहे. तसेच रशियन भाषेमध्ये देखील हा पोवाडा पुस्तकरूपी लिहिला गेला.

नगरपालिकेतील गटनेते नगरसेवक कैलास कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष अनिल ढावरे, उपाध्यक्ष राजाभाऊ सागर, चंदू सोनवणे,दादा ढावरे, कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, खजिनदार विकास ढावरे, सचिव बाळासाहेब अडसूळ, सामाजिक कार्यकर्ते ललेंद्र शिंदे, नाथा ढावरे, राजू मुळीक, नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग शिंदे, भाजपा शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, शेरखान पठाण, ॲड.नारायण ढावरे,अविनाश कोथमिरे, सचिन जामदार, राजू राऊत, सागर गानबोटे, राहुल जौंजाळ, आबासाहेब ढावरे, सतीश सागर, आनंद मखरे, अभिजीत अवघडे उपस्थित होते.