103 नागरिकांची कोरोनावर मात तर 283 व्यक्तींना नव्याने लागण ; इंदापूरची परिस्थिती पुन्हा जैसे थे

103 नागरिकांची कोरोनावर मात तर 283 व्यक्तींना नव्याने लागण ; इंदापूरची परिस्थिती पुन्हा जैसे थे

इंदापूर || इंदापूर तालुक्यातील 283 व्यक्तींची कोरोना चाचणी गुरुवार दिनांक 6 मे रोजी पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 238 तर शहरातील 45 व्यक्तींचा समावेश आहे. मागील दोन दिवसांमध्ये इंदापूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली होती,मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येने उच्चांक गाठल्याचे दिसून येत आहे.

गुरुवारी 283 व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी याच दिवशी उपचार घेणाऱ्या 103 नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 84 तर शहरातील 19 व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे  नागरिकांनी न घाबरता या महामारीचा सामना करावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी केले आहे. 

दहा नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू 

गेले अनेक दिवस इंदापूर तालुक्याचा कोरोना विषाणूची दाहकता अधिक दिसून येत असून आजपर्यंत कोरोनामुळे 260 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.गुरुवार दिनांक 6 मे रोजी कोरोनामुळे दहा व्यक्तीचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यंची संख्या 270 इतकी झाली आहे.इंदापूर तालुक्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सध्या कायम असून हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करते आहे. मात्र मर्यादित यंत्रणा, अपुरी सुविधा, आरोग्य यंत्रणेवरील प्रचंड ताण,यासर्वामुळे मृत्यूचा दर कमी करणे प्रशासनाला अवघड जातेय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.