11 दिवसात घटली 1 हजार रुग्ण संख्या ; इंदापूर प्रशासनाला कोरोना लढ्यात मिळतयं यश

11 दिवसात घटली 1 हजार रुग्ण संख्या ; इंदापूर प्रशासनाला कोरोना लढ्यात मिळतयं यश

इंदापूर || राज्यात सध्या कोरोनाचा उद्रेक पहायला मिळतोय. रुग्ण संख्येच्या बाबतीत पुणे जिल्हा उव्वल स्थानी होता. मात्र गेल्या काही दिवसात पुणे जिल्ह्यातील रुग्ण संख्या घटताना दिसून येतेय. तर इंदापूर तालुक्यात ही प्रशासकीय यंत्रणेला कोरोनाची रुग्ण संख्या रोखण्यात मोठं यश मिळाल्याचे दिसून येतेय.

इंदापूर तालुक्याची कोरोना स्थिती अगदी हाताबाहेर गेली होती. त्यावर पुन्हा ताबा मिळण्यासाठी इंदापूर महसूल,पंचायत समिती, नगरपरिषद, आरोग्य विभाग,पोलीस विभाग यांसारख्या महत्वाच्या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न झाले. इंदापूर तालुक्यात 1 मे 2021 रोजी कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या  2 हजार 805 इतकी होती. यात  ग्रामीण भागातील 2 हजार 600 तर शहरातील 205 रुग्ण होते.

कोरोना नियंत्रण अधिकारी डाॅ.प्रशांत महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दि.11 मे 2021 रोजी अकरा दिवसात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 1 हजार ने घटली आहे.सध्या ग्रामीण भागातील 1592 व शहरी भागातील 213 रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहे.जवळपास 1 हजार ने रुग्ण संख्या घटल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही अंशी कमी झाला असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

रुग्णसंख्या कमी होण्याची ही आहेत कारणे…

अकरा दिवसात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या घटन्यामागे त्यांनी अनेक कारणे सांगितली आहे. सर्व शासकीय यंत्रणेने घेतलेला सक्रिय सहभाग व नागरिकांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी एकजुटीने हा लढा दिला. तालुक्यातील अधिग्रहन करण्यात आलेली अकरा खाजगी रूग्णालये यांनी देखील महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. तर आरोग्य विभाग मग तो उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रूग्णालये अगर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र या सर्वच ठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला. कोणत्याही प्रकारचा गाफीलपणा न ठेवता रात्रंदिवस हे कर्मचारी लढा देत आहेत. त्यामुळेच त्यांच्या कष्टाला फळ मिळताना दिसत आहे. 

शेवटचा रुग्ण कोरोनामुक्त होईपर्यंत पूर्ण ताकदीने काम करणार…

इंदापूर आरोग्य यंत्रणेकडे सध्या 13 व्हेंटीलेटर आहेत.याशिवाय खाजगी व शासकीय रूग्णालयातील आँक्सिजन खाटांची संख्या ही 359 इतकी आहे.आजही काही नागरिक अंगावर आजार काढत असून परिस्थिती गंभीर झाल्यावर उपचारासाठी रूग्णालयात दाखल होत आहेत. परिणामी आँक्सिजन खाटांची कमतरता भासते,रुग्णाला त्रास होतो. त्यासाठी काही लक्षणे जानवताच वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.आज जरी रुग्णसंख्या घटली असली तरी शासकीय यंत्रणा गाफील राहणार नाही. तालुक्यातील शेवटचा रुग्ण कोरोनामुक्त होईपर्यंत पूर्ण ताकदीने काम करणार असा विश्वास तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सुनिल गावडे यांनी व्यक्त केला.

अकरा दिवसात 17 हाॅटस्पाँट गावे कमी झाली…

राज्यसरकारने ब्रेक दी चैन अंतर्गत जे निर्बंध लागू केले त्याचाही परिणाम दिसून आला आहे.कठोर निर्बंधामुळेच ही संसर्ग रोखण्यात काही अंशी यश मिळवले आहे.तालुल्यातील 59 ग्रामपंचायतीने ग्रामस्तरावर संस्थात्मक विलगीकरण कक्षाची निर्मीती केल्यामुळे आरोग्य यंत्रणेला तर हातभार मिळालाच पण वाढत संसर्ग तोडण्यासाठी याची महत्वाची मदत होत आहे. बाधित व्यक्ती विलगीकरणात ठेवल्याने ही साखळी तोडणे आता सुखर होईल अशी आशा आहे. तालुक्यातील जेष्ठ नागरिक व 45 वर्षावरील 90 हजार व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे.त्यामुळे काही अंशी त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यात यश मिळेल. 1 मे रोजी तालुक्यात 69 गावे ही हाॅटस्पाॅट होती,अकरा दिवसानंतर ही संख्या 52 इतकी झाली आहे.हे प्रशासकीय यंत्रणेचे मोठे यश असल्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी म्हटले आहे.

लाॅकडाऊन काळात नागरिकांनी सहकार्य करा…

कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ही संपूर्ण साखळी तोडण्यासाठी मंगळवार पासून सात दिवसाचा कडक लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. या कालखंडात नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागेल,मात्र त्याला इतर कोणताही पर्याय नाही.नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करुन त्यांचे मनोधैर्य वाढवावे. नागरिकांनी आपल्या आरोग्यासह कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी,आरोग्याची काही समस्या जानवल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. - अनिल ठोंबरे,तहसीलदार 

होम टू होम सर्वेक्षणाचा फायदा झाला 

इंदापूर शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शिक्षकांच्या मदतीने शहारातील प्रत्येक प्रभागात घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यावर भर दिला. या कामी तीस टीम कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. हाॅटस्पाॅट भागाचा सर्वे केल्याने संशयीत रुग्णांवर वेळीच उपचार करता आले व मोठ्या प्रमाणात पसरणारा संसर्ग रोखता आला.शिवाय नगरपरिषद आरोग्य विभागाने शहरात जंतुनाशक फवारणी करण्याचे काम चालू आहे. - अंकिता शहा,नगराध्यक्षा